गावातील एखाद्या जुन्या मंदिराच्या आवारात अनेक प्रकारचे उभे दगड आढळून येतात. या दंगडांवर विविध आकृत्या कोरलेल्या असतात. एखाद्या दगडावर तीन ते चार रकाने असतात व प्रत्येक रकण्यात वेगवेगळ्या मानवी, पशूंच्या आकृत्या असतात. एखाद्या दगडावर एक हात कोरलेला असतो. एखाद्या दगडावर खाली एक गाढव एका स्त्रीशी समागम करत आहे अशी आकृती असते व त्याच्यावर काहीतरी संदेश कोरलेला असतो. हे सगळे केवळ काहीतरी विचित्र आकृत्या कोरलेले दगड आहेत म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हेच दगड त्या मंदिराचा, गावचा इतिहास सांगणारी साधने आहेत. त्या वेगवेगळ्या दगडांचे नेमके अर्थ काय ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. साधारणत: असे चार प्रकारचे दगड आढळून येतात १) वीरगळ २) सतीगळ ३) गधेगळ ४) साधूगळ
१) वीरगळ (Hero Stone)
गळ म्हणजे दगड आणि वीरगळ म्हणजे वीराचा दगड. एखाद्या व्यक्तिला वीरमरण आले असेल तर त्याच्या स्मरणार्थ तो कोणत्या कारणाने मरण पावला हे दाखवणारा तो दगड असतो. वीरगळाची ऊंची तीन ते साडेतीन फुट असते. ज्यावर तीन ते चार रकाने असतात. सगळ्यात खालच्या रकाण्यात तो वीर कशामुळे मरण पावला हे दाखवणारे कोरीव काम असते. त्या वरच्या रकाण्यात त्या व्यक्तिला अप्सरा पालखीतून, रथातून किंवा त्याला पकडून कैलासात घेऊन जात आहेत हे दाखवीलेले असते आणि सर्वात वरच्या रकाण्यात तो व्यक्ति शिवतत्वात विलीन झाल्याने शिवलिंगाची पुजा करताना दाखविलेला असतो.
साधारणपणे अशा वीरगळामध्ये सगळ्यात खालच्या रकाण्यात एखादा व्यक्ति युद्ध करताना मरण पावला असेल तर युद्धाचा प्रसंग कोरलेला असतो, आपल्या गाई-म्हशींचे, शेळ्यांचे रक्षण करताना वाघ, सिंह, लांडगा यांच्याशी लढताना मरण आले असेल तर तसा प्रसंग कोरलेला असतो, गावावर परकीयांनी आक्रमण केले असेल व त्यांच्याशी लढताना मरण आले असेल तर तसा प्रसंग कोरलेला असतो, चोरांशी लढताना मरण आले असेल तर तसा प्रसंग कोरलेला असतो. म्हणजे वीरगळामध्ये सगळ्यात खालच्या रकाण्यात ज्या कारणाने व्यतीला वीरमरण आले असेल ते कारण दाखवणारा प्रसंग कोरलेला असतो. त्या वरील रकाण्यातील अप्सरा स्वर्गात नेतानाचा व शिवलिंगाची पुजा करतानाचा प्रसंग थोड्या बहुत फरकाने सगळ्या वीरगळावर एकसारखाच असतो. कधी कधी वीरगळावर चंद्र व सूर्य कोरलेले असतात. म्हणजे जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत या वीराची कीर्ती राहील असा त्याचा अर्थ असतो.
प्रदेश बदलेल त्याप्रमाणे वीरगळाच्या पद्धतीत थोडेफार बादल झालेले आढळून येतात. कोठे शिवाऐवजी विष्णूची पुजा करणारा प्रसंग वरच्या रकाण्यात कोरलेला दिसतो तर कोठे नृसिंहाची पुजा करतानाचा प्रसंग. तसेच वीरगळाची ऊंची व आकार यातही प्रदेशानुसार फरक पडलेला आढळतो. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र या प्रदेशात वीरगळं मोठ्या प्रमाणात आढळतात.
वीरांची अशा प्रकारची स्मारके तयार करण्याची परंपरा ही कर्नाटकात सुरू झाली असल्याचे मानले जाते. तिथूनच ही परंपरा महाराष्ट्रात आली. चालुक्य, राष्ट्रकूट घराण्याचे राज्य ज्या भागावर होते तेथे तेथे अशी वीरगळं मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
२) सतीगळ
एखादी स्त्री पतीबरोबर सती गेली असेल तर तिच्या स्मरणार्थ सतीगळ तयार केले जात. वीरगळाप्रमाणेच सतीगळ उभ्या दगडावर रकाने करून कोरला जाई. काही सतीगळावर स्त्रीचा खांद्यापासून एक हात कोरलेला असतो, त्याच्या बाजूला तिची मुले कोरलेली असतात. काही सतीगळावर एका रकाण्यात सरणावर बसलेली स्त्री, दुसर्या रकाण्यात ते पती-पत्नी, तिसर्या रकाण्यात शिवतत्वात विलीन होऊन शिवाची पुजा करताना ते पती-पत्नी असे प्रसंग कोरलेले असतात. बहुतेक सतीगळांवर स्त्रीचा हातच कोरलेला असतो, पतीच्या दोन्ही पत्नी सती गेल्या असतील तर दोन हात, तीन पत्नी सती गेल्या असतील तर तीन हात कोरलेले असतात.
एखाद्याला वीरमरण आले असेल व त्याची पत्नी सती गेली असेल तर अशा वेळी वीरगळावरच सतीचा हात कोरलेला दिसतो. म्हणजे वीरगळ व सतीगळ एकत्रितपणे कोरलेल्या आढळतात.
३) गधेगळ
एखाद्या दगडावर खाली एक गाढव किंवा घोडा किंवा डुक्कर एका स्त्रीशी समागम करत आहे अशी आकृती असते व त्याच्यावर काहीतरी संदेश कोरलेला असतो. अशा प्रकारच्या दगडांना गधेगळ म्हणून ओळखले जाते. गधेगळ हे एक दानपत्र असे. एखाद्या गावाला राजाने जमीन वगैरे दान दिले असेल तर त्याचा मजकूर मधल्या भागात कोरलेला असतो आणि त्याच मजकुरात शेवटी धमकी किंवा शिक्षा लिहलेली असते. सर्वात खाली स्त्री व गाढव यांच्या समागमाचा प्रसंग कोरलेला असतो. या गाधेगळा अर्थ असा असे की जो कोणी राजाने मजकुरात लिहलेल्या आज्ञेचे पालन करणार नाही त्याला शिक्षा म्हणून त्याच्या स्त्रीचा गाढवाशी समागम केला जाईल. त्याकाळी अशिक्षित जनतेला अशा कोरीव आकृत्यांवरून त्या आदेशाची गंभीरता लक्षात येत असावी. राजाने ज्या कारणासाठी एखादी जमीन, वास्तु दान दिली असेल त्याचा इतर कारणासाठी दुरुपयोग होऊ नये म्हणून शेवटी मजकुरात व आकृती रूपात गधेगळावर ती धमकी किंवा शिक्षा लिहली जात असावी. काही गधेगळावर सर्वात वरती चंद्र व सूर्य कोरलेले आढळतात. याचा अर्थ या आज्ञेचे पालन चंद्र-सूर्य असेपर्यंत केले जावे असा असतो.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे गधेगळ आढळून येतात. मात्र त्यावरील स्त्री व गाढवाची आकृती यामुळे त्याला अश्लील समजून विद्रूप केले जाते किंवा त्यावर शेंदूर, रंग फासला जातो. यामुळे त्यावरील मजकूर अस्पष्ट होऊन वाचण्यायोग्य राहत नाही. अनेक ठिकाणी गधेगळ रानात, नदीत फेकून दिल्याचे आढळते.
४) साधूगळ
एखाद्या साधूच्या स्मरणार्थ वीरगळाप्रमाणेच कोरीव काम असलेले हे दगड असतात. सर्वात खालच्या रकाण्यात एक साधू दाखवलेला असतो, वरच्या रकाण्यात त्याला स्वर्गात नेताना अप्सरा व सगळ्यात वरच्या रकाण्यात देवाची पुजा करताना साधू दाखवलेला असतो.
वीरगळ, सतीगळ, गधेगळ, साधूगळ हे असे कोरीव दगड महाराष्ट्रातील गावागावांत आढळतात. एखाद्या प्राचीन मंदिराच्या किंवा वास्तूच्या परिसरात असे दगड ठेवलेले दिसतात. असे दगड बनविण्याची परंपरा इ.स. नवव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत अस्तीत्वात होती असे दिसून येते. आधुनिक काळात अनेक वेळा हे कोरीव प्रसंग म्हणजे पुराणकथांतील देवी-देवतांचे काही प्रसंग असावेत असा समज होऊन त्याची पुजा केली जाते, शेंदूर लावून त्यावर तेल घातले जाते. यामुळे अनेक दगडांवरील लेख, प्रसंग अस्पष्ट झालेले आहेत.
तुमच्या गावात असे काही दगड असतील तर त्याचे निरीक्षण करा. त्यावरील कोरलेले प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करा, काही मजकूर लिहला असेल तर तो तुमच्या वहीत लिहून घ्या व त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातील विविध ऐतिहासिक घटनांची माहिती त्यातून मिळेल. कदाचित तुमच्या गावाला शेकडो वर्षांचा इतिहास असेल!
--------*-------
वीरगळ, वीरगळ म्हणजे काय?, वीरगळ मराठी माहिती, महाराष्ट्रातील वीरगळ, वीरगळ सतीशिळा, वीरगळ बद्दल माहिती, साधूगळ, साधूशिळा, गद्धेगळ, गधेगळ, गधेशिळा, गद्धेशिळा, वीरशिळा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू