छत्रपती शिवाजी महाराजांचा, संपूर्ण इतिहास. हा इतिहास, पाठ्यपुस्तकात जसा आहे, तसा आपण पाहणार आहोत.
पाठ एक: शिव् जन्मापूर्वीचा महाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराज, थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती, मोठ्या समारंभाने, आणि आदराने साजरी करतो. आपण सर्व त्या दिवशी, किती आनंदात असतो! महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतो, पोवाडे म्हणतो, त्यांच्या तस्बिरीला हार घालतो. मोठ्या उत्साहाने, “शिवाजी महाराज की जय!", असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळी सर्वत्र, राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे, प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत; पण त्या काळातही, असे काही राजे होऊन गेले, की ज्यांनी प्रजेच्या कल्ल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, हे आपल्या कल्ल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव, गौरवाने घेतले जाते.
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वताचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग, अहमदनगरचा निजामशाहा, आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्न्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वत्अनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत. आपाप्सात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. या सार्या गोष्टींमुळे, रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.
पाठ दोन: संतांची कामगिरी
छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी, सुमारे तीनचारशे वर्षे, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा महाराजांना, स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला.
महाराष्ट्रात श्रीचक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संतपरंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालविली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा, समर्थ रामदास इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो.
त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनांत निर्माण केली.
श्रीचक्रधर स्वामी : श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.त्यामुळे त्यांना अनेक स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ' असे म्हणतात. श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे “लीळाचरित्र हा ग्रंथ होय.
संत नामदेव : संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनांत निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानवधर्माचा संदेश पोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरांतून मोठ्या भक्तीने गायले जातात.
संत ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे. निवृत्तिनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्या वेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, त्याचे कारण असे- त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. घर सोडले होते, पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. लोक त्या मुलांचा छळ करत होते.
ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दु:ख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दु:ख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, “ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखीकष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील?'' बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दु:ख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, “ईश्वरावर श्रदूधा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा.” त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात एकसारखा घुमत आहे.
त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून “ज्ञानेश्वरी" हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजबळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी - कार्तिकीला आळंदी - पंढरीला
जातात.
संत एकनाथ : संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या वब भारुडे लिहिली. कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही, तर मुक्या प्राण्यांवरदेखील त्यांनी दया केली. प्राणिमात्रांवर दया करा, असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत.
एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी
आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडेतिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले.
अशा रीतीने स्वत:च्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.
संत तुकाराम : शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे त्यांनी अनेक संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्यानडल्यांना कर्ज देत; पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडडबली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात. कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत -
'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।'
हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला 'ग्यानबा-तुकाराम' हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच 'ग्यानबा' असे म्हणतात. “तुकारामगाथा' आजही घरोघरी वाचली जाते.
समर्थ रामदास : त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत 'जय जय रघुवीर समर्थ' अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला 'रामाचा दास' म्हणू लागले. 'दासबोध' या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सदूवर्तत यांची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. “सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे', हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुदूध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला.
साधुसंतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनांत आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्यस्थापनेसाठी उपयोग करून घेतला.
पाठ तीन: मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे.
धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनांत भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली.
तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशाहा आणि अहमदनगरचा निजामशाहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत.
शूर मराठा सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वत:ला आपल्या जहागिरीचे राजे समजत.
विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत.
शौर्याची परंपरा : हे सारे सरदार शूर बीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्या वेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे; पण असे असले तरी, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.
सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजबळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे-जाणारेही हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो?
त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्यामनातले श्रीशिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडीमाणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले ? कोण होते हे शिवभक्त ? ते होते मालोजीराजे भोसले
वेरूळचे भोसले : वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या. बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटिलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती.
मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहाने स्वारी केली होती. त्या वेळी दौलताबाद ही
निजामशाहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली.
भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीराजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली.
शहाजीराजे निजामशाहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाहाही त्याला मिळाला, तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुदूद मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर' हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.
पाठ चार: शिवरायांचे बालपण
शिवजन्म : ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले.अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे,
हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले.
.... आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३0. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदीआनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव "शिवाजी" ठेवले.
शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली; पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली.
गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ! ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद ! लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.
शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशाहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजाम- शाहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाहा शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली.
दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहाचीच हत्या केली. निजामशाहीत अंदाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूख मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला, तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.
वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशाहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाहा शाहजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशाहास तंबी दिली, तेव्हा आदिलशाहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला.
आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले; परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाइलाज होऊन १६३६ साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही; परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला.
शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे-सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशाहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशाहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले.
शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर, तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ-शिवबांची धावपळ चालू असायची. त्या वेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशाहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरवू लागले.
पाठ पाच: शिवरायांचे शिक्षण
स्वतः: शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या - वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वत: वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला.
लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबयोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज, तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले.
जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंचउंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूपखूप आनंद झाला. त्या वेळचे पुणे आजच्याइतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची
नासधूस झाली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती.
जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ-संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
शिवराय पुणे जहागिरीत आले, तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या.
उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला.
जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व॒ युध्दनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला, तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशाहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वत:च आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या.
मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी-कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे, असे शिवरायांना वाटे.
घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, “शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण. त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तूसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तूसुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील.”
आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले, तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले.
पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूर्हून पुण्याला पाठवताना सामराज नीळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या
जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा, म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता !
त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती, तेव्हा जिजामाता म्हणाल्या,'“आता शिवबाचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत.'' मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू